कोल्हापूर (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीच्या पुर्नरचीत अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा आणि त्या अनुषांगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी ८ ऑक्टोबपर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी बारावीच्या पुर्नरचीत अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व त्या अनुषंगीक बाबींसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांची evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रामध्ये आपली माहिती १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. नावनोंदणीस दिलेल्या मुदतीनंतर लिंक बंद केली जाणार असल्याने शिक्षकांनी विहित मुदतीत आपल्या नावाची नोंदणी करावी, असेही भोसले यांनी स्पष्ट केले आहे.