कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने हनुमान जयंती आणि महावीर जयंती साजरी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. २५ एप्रिलरोजी महावीर जयंती आहे. तर २७ एप्रिलरोजी हनुमान जयंती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रमाणे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच हनुमान जयंती आणि महावीर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये.