पोलिसांची माफी मागा, अन्यथा सर्व धंदे बाहेर काढू..!

0
107

रत्नागिरी (प्रतिनिधी) :  कोणताही पुरावा नसताना पोलीस हप्ते घेतात, हे म्हणणं बेजबाबदार आहे. आणि असे वक्तव्य करणाऱ्या  गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची तात्काळ माफी मागावी. नाहीतर त्यांचे सर्व धंदे पुराव्यासकट बाहेर काढू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जाधव यांनी जर महाराष्ट्र पोलिसांची माफी मागितली नाहीतर त्यांचे सर्व धंदे पुराव्या सकट बाहेर काढू.   जाधव हे कोकणातील आमदार असल्याचे सांगायला देखील लाज वाटते. ते नुसतंच बोलत असून कामं काहीच करत नाहीत. त्यांच्या नशिबाने मोठी पदं मिळूनही त्यांनी कोणताही विकास केलेला नाही.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये दारू विक्री केल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे  उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. याबद्दल जाधव यांनी पोलिसांचाच समाचार घेतला. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का, असे विधान आमदार  जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. यावरूनच राणे यांनी जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.