शेतकऱ्यांची माफी माग, अन्यथा…! : कंगनाला काँग्रेस नेत्याचा इशारा

0
92

भोपाळ (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांची माफी माग. नाहीतर तुझ्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही,  असा इशारा मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव मनोज आर्य आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेकराम यादव यांनी अभिनेत्री कंगना राणावतला दिला आहे. कंगनाने दिल्लीच्या सीमेवर  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी असे म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.   

कंगनाच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. याच काळात तिने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यामुळे तिने शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास हे चित्रीकरण बंद करु, अशा इशारा  मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. कंगनाने देशातील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे तिने माफी मागितली पाहिजे, असे मनोज आर्य आणि नेकराम यादव यांनी  म्हटले आहे. दरम्यान, याबाबत बेतूल येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.