गडहिंग्लजमध्ये प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र

0
513

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी शहरात प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. आज (रविवार) गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात कोरी यांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बाजारातील प्रत्येक विक्रेत्याजवळ तसेच सर्व दुकानात जाऊन त्यांची कडक तपासणी केली. यावेळी सुमारे दोनशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. दुकानदार, विक्रेते आणि नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

दरम्यान, प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी घालून एक वर्ष उलटले, तरी अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा वापर सर्रास सुरूच  आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतर वापर  तेवढ्या पुरता थांबतो.  आणि काही दिवसानंतर तो पुन्हा सुरू होतो.  यावर जालीम उपाय महेश कोरी यांनी शोधून काढला आहे. प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करून नागरिकांनी स्वतःचा अपमान करून घेऊ नये.  तसेच दुकानदारांनीही कॅरीबॅग दुकानात ठेवू नये,  असे आवाहन त्यांनी व्हॉट्सअप वरून केले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या मेसेजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. आता त्यांनी स्वत:  रस्त्यावर उतरून प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.