पुणे (प्रतिनिधी) : मंत्री धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने हा गंभीर आरोप केला. पुणे येथे आज (गुरुवार) भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसोबत पत्रकार परिषद घेतली. पोलिसांत तक्रार देऊनही राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित महिलेसह तृप्ती देसाई यांनी केला.

‘पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला जात नाही. पुरावे देऊन वर्ष उलटलं तरी माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचा  असल्याने माझ्यावर अन्याय केला जात आहे. मला धमक्या देण्यात आल्या, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. पोलिसांनी मागच्या वर्षी या प्रकरणात लाच घेतली, याचे माझ्याकडे पुरावे आहेत. या सर्वांची नार्को टेस्ट करावी आणि माझ्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ५० पेक्षा जास्त अर्ज दिले आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही अर्ज दिला होता. मुख्यमंत्री महोदय माझ्याही आत्महत्येची वाट बघताय का ?’ असा सवालही पीडित महिलेने केला आहे.

तृप्ती देसाई यांनीही राज्य सरकारवर टीका केली. राजकीय क्षेत्रातील लोकांवर आरोप जेव्हा होतात तेव्हा लगेच कारवाई होत नाही. इतर लोकांवर जेव्हा आरोप होतात तेव्हा लगेच कारवाई करतात. सुप्रिया सुळे, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांना माहिती असून कुणीही याबाबत का बोलत नाही? जर राजेश विटेकरांविरोधात गुन्हा दाखल केला नाही तर परभणीत आंदोलन करण्याचा इशाराही देसाई यांनी दिला आहे.