श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा जगासमोर आपल्या नव तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला आहे. आज (शनिवार) दुपारी तीननंतर एओएस -०१ अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह संपूर्ण स्वदेशी बनावटीचा आहे.

एओएस-०१ हा उपग्रह शत्रुराष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्या सिंथेटिक अपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. हा उपग्रह ढगांचे अडथळेही भेदून चांगल्या प्रतीची छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे. चीन, पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर आगळीक होत असताना लष्कराला याची मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कृषी, भूविज्ञान, समुद्र किनाऱ्याबरोबरच अन्य क्षेत्रातही सुरक्षा मजबूत करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होईल.