मुंबई (प्रतिनिधी) : फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना  महाविकास आघाडी सरकारकडून  स्थगिती देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना ठाकरे सरकारने आणखी एक निर्णय रद्द केला आहे. मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा निर्णय रद्द  करण्यात आला आहे.

राज्यातील भाजप सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) ला मनोरा आमदार निवास्थानाच्या पुनर्बांधणीचे काम देण्यात आले होते. आता हा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. मनोरा या नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. या कामाचा आढावा घेण्यासाठी  विधान भवनात बैठक घेण्यात आली.  त्यावेळी या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मनोरा आमदार निवासस्थानचे काम राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. तसेच नवीन आमदार निवासाचे काम  जलदगतीने पूर्ण करण्याच्या  सूचना या बैठकीत सभापती आणि अध्यक्षांनी दिल्या.