राज्य सरकारकडून आणखी एक झटका : घर, जमीन खरेदी-विक्री आणखी महागली…

0
140

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या एका निर्णयाने घर खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. घर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. मुद्रांक शुल्कात  (स्टँप ड्युटी) दिली जाणारी २ टक्के सवलत उद्या म्हणजे १ एप्रिलपासून रदद् करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता घर, जमीन विक्रीसाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता. पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे आधी मुद्रांक सवलत मिळत होती, ती मिळणार नाही. राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षी राज्यशासनाने दिनांक ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. सदर सवलत संपुष्टात आली असून यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहतील.

वास्तविक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मत होते की, परत एकदा कोरोनाचे संकट वाढेल अशा काळात बांधकाम व्यवसायिक तसंच घर खरेदी विक्री जमीन करणाऱ्या लोकांना देखील स्टॅम्प ड्युटीच्या निमित्ताने किमान तीन महिने सवलत द्यावी. पण त्यास मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या वित्त विभागाने ग्रीन सिग्नल न दिल्याने मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.