कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ५५ वा वर्धापनदिन आज (मंगळवार) कोल्हापुरात मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. दरम्यान नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोककलावंतांसाठी राज्य शासनाच्या वतीने समिती गठीत करण्यात आली असून चित्रपट व्यवसायातील लोककलावंतांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे कलाकारांना मदत मिळवून देण्यासाठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली. तसेच कलावंत आणि तंत्रज्ञ यांना औषधोपचारासाठी  आर्थिक मदत देण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची परवानगी घेऊन अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलीत.

यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर यांच्यासह महेश पन्हाळकर, सुरेंद्र पन्हाळकर, आकाराम पाटील, पूजा शिंदे, सदाशिव पाटील, सदानंद सुर्यवंशी, मंगेश मंगेशकर, प्रमुख व्यवस्थापक रविंद्र बोरगावकर, महामंडळाचे सभासद, कर्मचारी उपस्थित होते.