‘सामना’तील टीकेला अण्णा हजारेंचे सडेतोड प्रत्युत्तर…

0
201

नगर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यामुळे शिवसेनेचे वाचाळ नेते, खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) ‘दै. सामना’च्या अग्रलेखातून त्यांच्यावर खरपूस टीका केली होती. या टीकेला अण्णा हजारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात आंदोलने मी केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचेही नेते आहेत. तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे हे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय, असे त्यांनी म्हटले आहे.

हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. सामनाच्या अग्रलेखातून अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत. आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय ? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय असे शिवसेनेने म्हटले आहे.

यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. सर्वच पक्षांच्या सरकार विरोधात आपली आंदोलने झाली आहेत. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो आहोत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात २०१४ पासून अनेक वेळा मी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकार विरोधात आतापर्यंत आपली सहा आंदोलने झाली आहेत. आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा. मी सगळंच बाहेर काढतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला, तुम्ही त्याला कसे पाठीशी घातले याची मी सर्व माहिती देईन,’ असा इशाराही त्यांनी दिला.