मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधी पक्षांनी थेट शिंदे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. खासकरुन मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर प्रामुख्याने टीका होत आहे. दोन नावे बघून खूप वाईट वाटल्याचे सांगत  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अंजली दमानिया मैदानात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांना थेट मंत्रीपद दिल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. ‘एकनाथ शिंदे यांना माझा एकच प्रश्न. आनंद दिघे यांचे शिष्य ना तुम्ही? मग संजय राठोड सारख्या माणसाला आनंद दिघे यांनी खपवून घेतले असते का? तुमच्याच चित्रपटात तुम्ही दाखवलाय की एका मुलीवर अत्याचार करणार्‍या माणसाला त्यांनी काय शिक्षा दिली. मग तुम्ही त्यांचे शिष्य कसे?, असे ट्विट करत अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरले आहे.

संजय राठोड अशा माणसाला मंत्रिपद कसे देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी असा टोलाही दमानिया यांनी लगावला आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राठोड यांना थेट महिला आणि बालविकास खातं देण्याची मागणी केली आहे. ‘चित्रा वाघ या संजय राठोड यांच्या विरोधात लढत होत्या; पण तुमच्या मंत्रिमंडळात महिला नसतील, तर संजय राठोड यांनाच नव्या सरकारने महिला आणि बालविकास खात्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड वनमंत्री होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती; मात्र पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांनी त्यांची तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण बंद झाले.

महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. दमानिया यांच्या आरोपामुळे भुजबळ यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. गेल्या वर्षी मुंबई सत्र न्यायालयाकडून छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. तर सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावेळी त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.