दापोली : साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी दापोली न्यायालयाने ठाकरे गटाचे आमदार अनिल परब व सदानंद कदम यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. साई रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. त्यात हा जामीन मंजूर झाला आहे. या सुनावणीसाठी हे दोघेही दापोली न्यायालयात हजर होते.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनिल परब व सदानंद कदम यांना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

साई रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोम्मया यांनी याची पोलिसांत तक्रार केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप सोम्मया यांनी केला आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले, असा आरोप आहे.

जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली. २०२० मध्ये  मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटींना विकण्यात आली. हे रिसॉर्ट बेकायदा आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाचा महसूलही बुडाला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोम्मया यांनी केली होती. याप्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात खेड न्यायालयाकडून परब यांना अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे.