मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद दौऱ्यावर गेलेले  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यावर  देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. औरंगाबादला दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी येत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण यापुढे अवश्य काळजी घेऊन, असे देशमुख यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, अनिल देशमुख  यांचा कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्या सोबत फोटो समोर आला आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा असून त्याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी हा औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून प्रसिध्द आहे.