अहमदनगर (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही जिल्हा दौरा करू लागले आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  

मंत्री मुश्रीफ यांनी आज (गुरूवार)  पाथर्डीतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी मुश्रीफांची गाडी रस्त्यात अडवून शेतकऱ्यांनी सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांना दाखवली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी त्यांच्याकडे केली.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, आम्ही अनेक वर्ष राज्याचे कामकाज चालवले आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला माहित आहे. आमची जनतेशी नाळ आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावे, हे विरोधकांनी सांगण्याची गरज नाही. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही. विशेष म्हणजे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचाच आग्रह असतो. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकार नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर करेल.