गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे आज दुपारपासूनच एका गरोदर महिलेच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला गारगोटीत दवाखान्यात आणल्याशिवाय पर्याय नाही. पण गारगोटीपर्यँतच्या दहा किलोमीटर अंतरात वेदगंगा नदीचे पाणी दोन ठिकाणी रस्त्यावर आलेले असलेने तिला दवाखान्यात न्यायचे कसे? हा प्रश्न समोर ठेवून घरचे नातेवाईक हवालदिल झाले होते. अशा प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या आणि हवालदिल झालेल्या नातेवाईकांना आधार मिळाला तो यांत्रिक बोटीचा. अशीच परिस्थिती बसरेवाडी या गावातील एका गरोदर महिलेची झाली होती.

भुदरगड तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसात कोसळणारा पाऊस,त्यामुळे वेदगंगा नदीला आलेला अभूतपूर्व महापूर, त्यामुळे सर्वच मार्ग वाहतुकीसाठी बंद अशा परिस्थितीत आज (शुक्रवारी) दुपारपासून भुदरगड तालुक्यातील एक गरोदर महिलेस प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. महिलेला होत असलेल्या जीवघेण्या वेदना आणि हवालदिल झालेले नातेवाईक मग कोणीतरी आपत्कालीन यंत्रणेला फोन केला आणि ही परिस्थिती कथन केली. मग भुदरगड तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले. बोट गारगोटीत होती प्रथम तिचा खाजगी वाहनाने तिरवडे ते शेणगाव असा प्रवास झाला. शेणगाव येथे नाईक मळ्यात रस्त्यावर पूराचे पाणी वाहत होते. त्या पाण्यातून स्टेचरवर ठेऊन तरुणांनी तिला पाण्यातून रस्त्यावर आणले. तिथून परत प्रवास वाहनाने आकुर्डे पर्यंत झाला. पण, आकुर्डे येथील पुलावर नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असलेने आकुर्डे येथे पुलावर भुदरगड प्रशासनाने खास यांत्रिक बोट सज्ज ठेवली होती. तिला व तिच्या नातेवाईकांना त्या बोटीत घेऊन ही बोट गारगोटी येथे आली. गारगोटी येथे सुद्धा पूराचे पाण्याच्या बाहेर रस्त्यावर रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती.

त्या रुग्णवाहिकेत बसवून तिला आणि नातेवाईकांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात सुखरूपपणे दाखल करणेत आले. त्या महिलेसह नातेवाईकांनी निःस्वास सोडला सुखरूपपणें दाखल केल्याबद्दल नातेवाईकांनी प्रशासनाचे आभार मानले. आकुर्डे येथे नाथाजी पाटील, प्रकाश पाटील, प्रा. विनायक कळके, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

अशीच परिस्थिती बसरेवाडी या गावातील एका गरोदर महिलेची झाली होती. बसरेवाडी हे गारगोटीपासून आठ किलोमीटर अंतरावर असून त्या महिलेस सुद्धा या महापुरातून यांत्रिक बोटीतून गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी आकुर्डे व शेणगाव परिसरातील युवकांनी मोलाचे योगदान दिले. तसेच प्रविण देवेकर, सचिन केनवडे, भाऊ पाटील, विकास केनवडे, संदीप दळवी, राहुल पाटील, अमोल पाटील, विशाल भाई मोरे, अक्षय मेगाणे, अविनाश कवडे यांचे मोलाचे योगदान लाभले .