गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

0
126

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी आज (शुक्रवार) धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांनी विविध लाभार्थ्यांना सेवा दिली आहे. पण शासनाकडून सेविकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. अनेक कर्मचारी वयाच्या ६५ वर्षानंतर रिकाम्या हाताने घरी गेले आहेत. २००३ पासून सातत्याने लढा दिल्याने सेवासमाप्तीचा लाभ मिळाला. परंतु १ लाख व ७५ हजार मिळणारी रक्कम पुरेशी नाही. ती वाढवून मिळावी. मासिक पेंशन सुरू करण्यात यावी. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा त्वरित लाभ द्यावा, मानधनाची निमी रक्कम पेन्शन रुपात द्यावी, मानधनात वाढ करून वाढीचा फरक त्वरित पेन्शनमध्ये अधिक करून मिळावा. तसेच ६० वर्ष पूर्ण झालेल्या सेविकांना फिटनेस सर्टिफिकेट उपजिल्हा रुग्णालयात मिळावे, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक आदीसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.