कुरुंदवाड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला साक्षी ठेऊन आंदोलन अंकुशच्या प्रमुख शिलेदारांनी संघटनेची ओळख असलेला बिल्ला लावून घेतला. तसेच यावेळी त्यांनी लोकशाहीला घातक ठरू पाहणाऱ्या भांडवलशाहीला विरोध व नोकरशाहीवर अंकुश ठेऊन शोषित वंचित कामगार शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कृतिशील राहण्याची शपथ घेतली.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रायरेश्वर या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी रयतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्याच गडावर त्याच मंदिरात रायरेश्वराला साक्षी ठेवून शिवरायांचे स्मरण करून आंदोलन अंकुश संघटनेच्या खांद्यावर लावण्याच्या बिल्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी शेतकरी व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी अखंडपणे लढत राहू, अशी शपथ आंदोलन अंकुश संघटनेच्या सर्व शिलेदारांनी घेतली.

यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे, राकेश जगदाळे, उदय होगले, दीपक पाटील, बाळासाहेब सोमण, अक्षय पाटील, भूषण गंगावणे, अनिल सुतार, संजय चौगुले, दत्तात्रय जगदाळे, विजय माने, धनाजी माने, विकास शेषवरे, अप्पा कदम, विरचंद पाटील, रशीद मुल्ला, संभाजी शिंदे, विशाल पाटील, मनोज राजगिरे, प्रवीण माने, बंटी माळी आदी उपस्थित होते.