मुंबई (प्रतिनिधी) : यवतमाळ पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्याचा संतापजनक प्रकार ताजा असताना अशीच एक घटना मुंबई महापालिकेत समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायलाचा प्रकार महापालिकेचे बजेट सादर करताना आज (बुधवार) घडला.

शिक्षण बजेट मांडले जात असताना पाण्याची बाटली समजून रमेश पवार यांनी सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले. यावेळी उपस्थितांनीही सॅनिटाझर प्यायले असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. यानंतर काही वेळासाठी ते तिथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.

दरम्यान, यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे सॅनिटायझर पाजल्यामुळे १२ बालकांची तब्बेत बिघडली. त्यामुळे त्या बालकांना रविवारी रात्री यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.