कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर पुण्यातील एक तरुण आपल्या पत्नी, मुलांसह गावी परततो. पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान होते, उपचार सुरू होतात, ते दोघेही उपचाराला प्रतिसाद देत असतात, मात्र अचानक पत्नीची तब्येत खालावते आणि तिचा मृत्यू होतो. पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने दोनच दिवसांत त्या तरुणाचाही मृत्यू होतो… दोन्ही छोट्या मुलांचं छत्र हरपतं आणि कुटुंबीयांसह सगळं गाव सुन्न होतं… कोरोनाचा कहर वाढत चालल्याचं हे विदारक चित्र…

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूरमधील कुटुंबातील महादेव गणपती पाटील आणि त्यांची पत्नी सीमा या तरुण दाम्पत्याचा दोन दिवसांच्या अंतराने कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात एका कंपनीत मोठ्या पदावर असलेले महादेव पाटील हे पत्नी आणि मुलांसह लॉकडाऊन लागून करण्यात आल्यानंतर आपल्या गावी – शित्तूर तर्फ मलकापूर येथे आले. काही दिवसांनी महादेव आणि सीमा यांना किरकोळ त्रास जाणवू लागल्याने कोरोनाची टेस्ट केली. दुर्देवाने दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. किरकोळ त्रास असल्याने कमी होईल, या विश्वासाने ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

नंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेली. मागील आठ दिवसांपासून या दाम्पत्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या दोघांना त्रास होता मात्र, तो गंभीर स्वरूप धारण करेल असे कुणालाच वाटले नव्हते. सीमा यांची तब्येत तुलनेने चांगली होती, मात्र बुधवारी दुपारनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी प्राणज्योत मालवली. हा धक्का महादेव यांना सहन झाला नाही. पत्नीच्या मृत्यूने खचलेल्या महादेव यांची तब्येत खालावत गेली. गुरुवारपर्यंत त्यांना केवळ ऑक्सिजन लावला होता. मात्र, सकाळी ११ च्या दरम्यान त्यांचीही तब्येत बिघडत गेली. रात्री साडेअकराच्या दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

दोनच दिवसांच्या अंतराने पती-पत्नीने जगाचा निरोप घेतल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महादेव यांचे मोठे भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे त्यांना शाहूवाडी येथे क्वारंटाइन केले आहे. महादेव यांची दोन मुले पूर्वा आणि तन्मय सध्या घरी आहेत. आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर दोघेही शून्यात नजर घालून बसले आहेत. घरी कुणीच नसल्याने सुन्न झालेल्या मुलांना सांगायचे काय असा प्रश्न नातेवाईक आणि महादेव पाटील यांच्या मित्रांसमोर पडला आहे.