दुर्दैवी ! कुत्र्यांच्या भयानक हल्ल्यात नवे दानवाडच्या वृद्धाचा जागीच मृत्यू

0
161

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड ते दत्तवाड दरम्यान असणाऱ्या शेतात काम करत असताना वृद्धावर ८ ते १० कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. आप्पासाहेब बाबू आंबूपे (वय ६५, रा. नवे दानवाड) असे त्याचे नाव असून हा दुर्दैवी प्रकार आज (सोमवार) दुपारी घडला आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

आप्पासाहेब बाबू आंबूपे हे आज दुपारी नवे दानवाड ते दत्तवाड हद्दीतील आपल्या शेतात गट नं. ११८९ मध्ये काम करीत होते. अचानक काही कुत्री त्यांच्या अंगावर धावून आली. त्यांनी त्यांच्यावर भयानक हल्ला चढवला. अक्षरशः त्यांचे लचके तोडले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ ठरला. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या वेळी त्यांच्या ओरडण्याने आणि कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने बाजूच्या शेतात काम करत असलेले शेतकरी धावत आले. मात्र कुत्र्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या कुत्र्यांच्या तोंडाला रक्त व मांस लागले असल्याचे निदर्शनास आले. या शेतकऱ्यांनी ऊसाच्या मडाने या कुत्र्यांचा त्यांचा प्रतिकार केला व त्यांना हाकलून लावले. यानंतर कुरुंदवाड पोलिसांनी या प्रकाराची माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे विकास अडसुळे, घाटगे, अमित चव्हाण, वनविभागाचे घनश्याम भोसले शिरोळचे वनपाल गजानन सकट, रेस्क्यू फोर्सचे निलेश तवंदकर, निलेश वनकुरे, संतोष गायकवाड, महेश चौगुले, श्रेयस धुमाळ व नवे दानवाडचे पोलीस पाटील घटनास्थळी उपस्थित होते.