कोल्हापूर  (प्रतिनिधी) : लसीकरणात प्रथम आम्ही लस घेवू न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या, असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, डॉक्टर्स यांनी केले. कोरोना लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत असे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई अध्यक्षस्थानी होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शनिवारी सुरू होणारी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. यानंतरचा दुसरा, तिसरा टप्पाही यशस्वी करण्यासाठी आपल्या स्तरावरून जनजागृती करावी. स्वत:च्या आणि कुटूंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, अत्यंत सुरक्षित व्हॅक्सीन आहे. याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, मास्क यासारख्या सुरक्षिततेचा अवलंब करण्यात येणार आहे.

होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप म्हणाले, कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन अतिशय सुरक्षित आहे. यामुळे प्रतिकार शक्ती निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.

कोल्हापूर मानसोपचार तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. पद्मराज पाटील, लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. या मोहिमेत आम्ही स्वत: प्रथम सहभागी होणार आहे. आम्ही लस घेतल्यानंतर निश्चितपणे आपणामधला आत्मविश्वास वाढेल. आपणही लस घ्यावी.

जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील, १६ पासून लसीकरणाला सुरूवात होत आहे. या लसीकरणामुळे कोरोनाविरूध्द लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के म्हणाले, १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होत आहे. या लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. न घाबरता ही लस टोचून घ्यावी आणि कोरोनामुक्त वर्षाकडे वाटचाल करू.

डॉ. राजेंद्र वायचळ, सचिव निमा असोसिएशन- कोरोनाविरूध्द लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लस घ्यावी. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, रोटरी क्लबचे सदस्य डॉ. आर.ए.पाटील,  मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी,  जमाते उलेमाचे अरिफसाहेब हवालदार, सिटी लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव नरेंद्र पाध्ये, डॉ. अनिता सयबन्नावर, निमाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी आदी उपस्थित होते.