मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्यामुळे केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर लावलेले निर्बंध आता सैल होऊ लागले आहेत. सर्व काही पूर्वपदावर  येत असल्याचे चित्र दिसत आहे. आता चित्रपट चाहत्यांसाठी एक खूशखबर समोर आली आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची  परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश करण्याची परवानगी असेल. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच चित्रपटगृहांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी दोन शोच्या वेळेमध्ये अंतर ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ऑनलाईन तिकीट बुकिंगवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या बऱ्याच कार्यक्रमांबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. ओटीटीवर सुरु असलेल्या सीरिज, कार्यक्रम, चित्रपटांना अजूनही सेन्सॉर बोर्डाचे नियम लागू नाहीत. त्यामुळे सतत येणाऱ्या तक्रारींची योग्य दखल घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.