साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खोकुर्ले गावाच्या स्मशानभूमीजवळ भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बाळू भागोजी कांबळे (वय ७१, रा. खोकुर्ले) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात आज (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडला असून गगनबावडा पोलिसांत त्याची नोंद झाली आहे.

बाळू कांबळे हे दुपारी अडीचच्या सुमारास शेताकडे जात असताना कोल्हापूरहून गगनबावड्याकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एम एच ०९ सी यू ६२९२) खोकुर्ले स्मशानभूमीजवळ त्यांना मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर चालक अरुण लक्ष्मण मिठबावकर (मु. माळवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) याने पलायन केले.

खोकुर्ले गावचे पोलीस पाटील कैलास इंजर यांनी गगनबावडा पोलीस ठाण्यामध्ये तत्काळ माहिती दिली . गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवालदार आर. डी. सौंदडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक, अनिल पाटील, प्रवीण पाटील, जयदीप बागडी व युवराज बोबडे करत आहेत.

कोल्हापूर – गगनबावडा रोडला साईड पट्ट्याच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून तातडीने साईट साईड पट्ट्याच दुरुस्त करून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.