पन्हाळा नगरपरिषदेस ई-रिक्षा भेट

0
95

पन्हाळा (प्रतिनिधी) : आसुर्ले – पोर्ले येथील एका फाउंडेशनतर्फे पन्हाळा नगरपरिषदेला व्यावसायिक सामाजिक बांधिलकी (CSR) मधून एक ई – रिक्षा भेट देण्यात आली. फाउंडेशनतर्फे एन. सी. पालिवाल यांनी ई – रिक्षाची चावी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना हस्तांतरित केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, आनंद कदम, श्री. मनिकंदन, श्री. कामोजी, श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्याधिकारी खारगे यांनी सांगितले की, सदर रिक्षाचा वापर हा स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधराअंतर्गत विविध प्रकारच्या जनजागृती साठी करण्यात येणार असून कोरोना सारख्या आपत्ती प्रसंगीही महत्वाचे संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य या इ-रिक्षाद्वारे सुलभ होणार आहे. कोणत्याही इंधनाचा वापर न करता फक्त विजेवर चालणारे हे वाहन असल्याने हा एक पर्यावरणपूरक उपक्रम ठरलेला आहे.

नगराध्यक्ष सौ. रुपाली धडेल यांनी या वेळी फौंडेशनचे विशेष आभार मानले आणि या वाहनाचा वापर जनतेच्या सेवेसाठीच करणार असल्याचे सांगितले.