कोल्हापूर (प्रतिनिधी) : हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांवरील उपचाराचे बिल शासन नियमानुसारच आकारले जावे, असा नियम आहे. मात्र कोल्हापुरातील ६७ हॉस्पिटलकडून १ एप्रिल ते १९ जुलै या काळात रुग्णांना तब्बल २ कोटी ७४ लाख ७ हजार १४७ रुपयांची बिले जादा आकारण्यात आल्याचे महापालिकेच्या ७ लेखापरिक्षकांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले. या सर्व हॉस्पिटलच्या बिलातून ही रक्कम कमी करून बिले अंतिम करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकाना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट यांनी दिली.

परीट यांनी सांगितले की, शहरामध्ये १ एप्रिल ते १९ जुलै २०२१ अखेर महापालिकेच्या २७ लेखापरीक्षकांनी ६७ हॉस्पिटलच्या  ८२९९ बिलांची तपासणी केली आहे. यामध्ये हॉस्पिटलने रुग्णांची रु. ५९, ७८, ५०, ५५४ ची बिले केली होती. या बिलांची लेखापरीक्षकांनी तपासणी करुन त्यातून २,४७,०७, १४७  बीलामधून कमी केले. विविध हॉस्पीटलची ही रक्कम कमी करुन रुग्णांची रु. ५७, ०४, ४३,४०७ ची बिले अंतिम केली आहेत. बिलातून कमी केलेली रक्कम संबंधित हॉस्पीटलकडून रुग्णांना परत केली जाते का याचीही वरिष्ठ अधिका-यांमार्फत चौकशी केली जाते.

लेखापरिक्षक यांनी काही हॉस्पीटलांना जादा घेतलेली रक्कम दाखवूनही ती रक्कम रुग्णांना परत करण्यास काही हॉस्पीटलनी नकार दिला होता. अशा १४ रुग्णांच्या नातेवाईकांच्या बिलाबाबत तक्रारी लेखापरिक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ६ तक्रारी समितीने निकाली काढून संबंधित रुग्णांना डिस्चार्ज झालेनंतरही रु.१,९८,२९३ परत मिळवून दिले आहेत. अद्याप ७ तक्रारी समितीकडे असून यावर लवकर निर्णय घेतला जाणार आहे. सर्व रुग्णांनी लेखापरिक्षकांकडून तपासणी करुन झालेनंतरच ती रक्कम हॉस्पीटलला अदा करावी असे आवाहन परीट यांनी केले आहे.