पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आपल्याच मित्रपक्षांतील शीर्षस्थ नेत्यांवर टीका करीत आहेत. नाना पटोले, संजय राऊत, नितीन राऊत, नवाब मलिक यांनी बेफाट विधाने करून पक्षाला अडचणीत आणायचे काम वारंवार केले आहे. आता यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची भर पडली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांच्यावर टीका करताना कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचेबद्दल आदर असला, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद असल्यानेच ते मुख्यमंत्रीपदावर आहेत, असे विधान करून शिवसेना नेत्यांना टोला लगावला आहे. यामुळे दोन्ही पक्षात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटनावरून पुणे जिल्ह्यातील शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांच्यात वाद रंगला आहे. खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप शिवाजी आढळराव यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केला. काल शुक्रवारी शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला.  तर आज (शनिवार) सकाळी खेड बायपास व दुपारी नारायणगाव बायपासची अधिकृत उद्घाटने करत डॉ. कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर बोचरी टीका केली.

कोल्हे यांनी यावेळी या कामाचा पाठपुरावा आपणच केला असून थेट उपस्थितांना कामाची वर्क ऑर्डर दाखवत आढळराव व माजी आमदार शरद सोनावणे यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यांची काम लोकांपर्यंत पोहचवावी, महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली, पण या अभियानाची कामे सोडून फक्त आमच्यावर टीका करणं हाच जर एककलमी कार्यक्रम असेल आणि हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल आदर आहे मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत याचे कारण पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे.

कोल्हे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद उफाळून यायची शक्यता आहे.