कोल्हापूर (प्रतिनिधी) : जि.प सदस्य व माजी शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये माझा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचे प्रसार माध्यमातून स्पष्ट होत आहे. त्यांनी जबाबदार पदावर काम केलेले आहे. ते सत्ताधारी पक्षाचे विद्यमान सदस्य असताना त्यांनी केलेले वर्तन अशोभनीय व निंदणीय आहे, अशी प्रतिक्रिया जि.प.चे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, जि.प.च्या शिक्षण समिती सदस्या प्रा. अनिता चौगुले यांनी शिक्षण विभागाशी संबंधित कामकाजाबाबत गंभीर तक्रारी केल्या होत्या. यावर प्रा. चौगुले यांना यापुढे तुम्हाला विश्वासात घेऊन जरूर तो सन्मान केला जाईल, असे उत्तर दिले होते. परंतु चौगुले यांच्या प्रश्नावर आणि माझ्या उत्तरावर घाटगे यांना राग का आला ? घाटगे यांनी किमान ३ वर्षे शिक्षण सभापती म्हणून काम  केले असल्याने त्यांनी त्या खुर्चीची किंमत ठेवणे अपेक्षित होते. माझ्या कामाच्या पद्धतीवर तोंडसुख घेताना मला पळताभुई थोडी करीन, अशा शब्दांमध्ये त्यांनी माझ्या विषयी भावना व्यक्त करणे म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अपमान करण्यासारखे आहे. परंतु त्यांच्या मागील ३ वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यास योग्य ते उत्तर मिळेल, याचे त्यांनी जरूर भान ठेवावे, असे यादव यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.