कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापुरातील नुकसानीच्या पंचनाम्याकरीता हॉटेल व्यवसाय सुरू असल्याबाबतचा सरपंचाच्या सहीचा नाहरकत दाखल देण्यासाठी ३ हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायाला अटक करण्यात आली. शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३, रा. शिवनगर, आंबेवाडी, ता.करवीर) असे अटक केलेल्या शिपायाचे नांव आहे. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

कोल्हापुरात जुलै महिन्यात आलेल्या महापुरामध्ये तक्रारदाराच्या आंबेवाडीतील  हॉटेल, परमिट रूममध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे  नुकसानीचा पंचनामा करण्याकरिता सरपंचाच्या सहीचा नाहरकत दाखल्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानंतर हा दाखल देण्यासाठी शिपाई शिवाजी चौगले यांनी तक्रारदाराकडे ३ हजारांची लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तपासाअंती लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित शिपायाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांनी केली.