आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :  ना. हसन मुश्रीफ  

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,  असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद आहे,  असा दिलासाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.

याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी २० वर्षापेक्षा जादा काळ झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे. लाभ क्षेत्रामध्ये जमिनी मिळण्यामध्ये अडचणी झाल्यानंतर प्रति हेक्‍टरला ३६ लाख रुपये या दराने २५८ हेक्‍टरसाठी एकूण ९३ कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले आहे. त्यापैकी १२९  हेक्‍टरसाठी २५८ जणांना ४६ कोटी ४४ लाख रुपये पॅकेजचे वाटप झाले आहे. तसेच १०६ हेक्टर जमिनीचे वाटप होऊन त्यामध्ये ९६ जणांना पूर्णता जमीन वाटप व ३२ जणांना अंशता जमीन वाटप झाले आहे.

दरम्यान, संकलन दुरुस्ती,  कुटुंबाची व्याख्या, चार एकरांपेक्षा जादा जमिनी देण्याबाबत अडचणी व इतर सर्व प्रश्नाचा निपटारा येत्या १५ दिवसांमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या १५ मार्चरोजी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांबरोबर प्रश्ननिहाय बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन  मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.