मुंबई (प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आमचे नेते राज ठाकरेंची माफीही मागितली असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाच्या मोठी तोडफोड केली. अखेर अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली.

अखिल चित्रे यांनी सांगितले की, अ‍ॅमेझॉनने आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण याबाबत क्षमस्व आहोत असं पोस्ट केलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं. राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत.