कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या कसबा बावडा येथील छ. राजाराम बंधारा हा दुरूस्तीकरीता दि. २५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर अखेर वाहतूकीकरीता बंद ठेवण्याचा निर्णय कोणाच्यातरी दबावाखाली येवून कार्यकारी अभियंत्यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे पालकमंत्री कसलेही लोकहिताचे काम न करता केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळयात धुळफेक करून राजकीय फायदा उचलण्याचे तंत्र यांना अवगत आहे. असा आरोप माजी आ. अमल महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

माजी आ. अमल महाडिक म्हणाले की, राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामास सुरूवात झाल्यानंतरच बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा निर्णय का घेतला गेला असावा ? कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्वच बंधारे सुस्थितीत आहेत का ? त्यांची यादी त्यांनी का जाहीर केली नाही ? की फक्त निवडणूकीच्या तोंडावर ऊस वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होवून कारखाना प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ करण्याचा यामागे काही हेतू होता ? असे बरेचसे प्रश्न या निर्णयानंतर उपस्थित झाले. पण आम्ही त्यावर कसलीही टिका टिप्पणी केली नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

तसेच राजाराम साखर कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालकांनी त्याच दिवशी हा निर्णय रद्द करून गळीत हंगाम संपल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशा आशयाचे विनंती पत्र जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता आणि प्रादेशिक सहसंचालकांना दिले होते. राजाराम साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कार्यतत्परतेमुळे शेतकऱ्यांचा रोष व्यवस्थापनावर न जाता उलट आपल्यावरच येईल या भितीने पालकमंत्र्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी (दि.24) ऑक्टोबर पाटबंधारे विभागाला निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले. आणि लगेच वर्तमानपत्र, मिडियाच्या माध्यमातून आपणच शेतकऱ्यांचा तारणहार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.

याआधी मुद्दाम कारखान्यासमोर आणि शेतकऱ्यासमोर अडचण निर्माण करायची व नंतर कारखान्याला त्या अडचणीतून बाहेर काढल्याचं नाटक पालकमंत्र्यांनी अतिशय उत्कृष्ठपणे वठविले असून  त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक आहे. पण सर्वसामान्य सभासद शेतकरी अडचणीत यावा म्हणून याआधीही गाडी अड्डयाच्या जागेवर आरक्षण टाकणे, विधानसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर कारखान्यावर दगडफेक करणे, वारंवार विस्तारीकरणास विरोध करून प्रगतीला खोडा घालणे असे उद्योग पालकमंत्री व त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेले असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग सपशेल फसल्याचेही ते म्हणाले.

त्यामुळे पालकमंत्री कसलेही लोकहिताचे काम न करता केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळयात धुळफेक करून राजकीय फायदा उचलण्याचे तंत्र यांना अवगत असले तरी इथून पुढच्या काळात आम्ही सातत्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडत राहणार आहे. कलंकीत राजकारणाला फाटा देवून  त्यांचा प्रत्येक कुटील डाव निश्चितपणे हाणून पाडू, यात तिळमात्र शंका असण्याचं कारण नसल्याचे अमल महाडिक म्हणाले. त्यामुळे कोणाच्यातरी दबावाखाली येवून कार्यकारी अभियंत्यांनी घेतलेला निर्णय राजाराम कारखान्याच्या विनंती पत्रानंतर त्यांनी स्वतःच रद्द केला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांचे आभार मानत असल्याचे माजी आ. अमल महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.