‘कॉर्बेवॅक्स’ मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेण्यास अनुमती

0
10

नवी दिल्ली (वृत्तांस्था) : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतासह अनेक देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस दिली जात आहे. सध्या भारतात नागरिकांना दोन डोस नंतर बूस्टर डोस देखील देण्यास सुरूवात केली असून दोन डोसमधील अंतरही केंद्राने कमी केले आहे. ज्यांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले असतील आता ते नागरिक कॉर्बेवॅक्स या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.

या सर्वामध्ये आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेणाऱ्यांना बूस्टर डोस म्हणून जैविक ‘ई कॉर्बेवॅक्स लस वापरली जाणार असून, याच्या वापराला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा डोस १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सब्यूनिट लस कॉर्बेवॅक्स ही असून ती कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून १२ ते १४ वर्षांच्या मुलांनी देण्यात येत आहे, तर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ४ जून रोजी १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून कॉर्बेवॅक्स लसीच्या वापराला परवानगी दिली आहे.