कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सेंद्रिय गटांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज (बुधवार) वाहन वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी महालक्ष्मी सेंद्रिय गटाला सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले.

जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण ३७ गट स्थापन झाले आहेत. या गटांना वाहन खरेदीसाठी १ लाख २० हजार रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये श्री. महालक्ष्मी सेंद्रिय शेती उत्पादक गट, धरणगुत्ती (ता. शिरोळ), ब्रम्हदेव सेंद्रिय शेतकरी गट, सरंबळवाडी (ता. आजरा), शंभू महादेव सेंद्रिय शेती गट, खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) या गटांनी वाहन खरेदी केली आहे.  

गटांनी वाहनाचा वापर शेतमाल विक्रीसाठी संत सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रावर आणण्याबाबत करावा. इतर वाहतुकीसाठी वाहनाचा वापर करू नये, अशा सूचना   जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक जालिंदर पांगरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच सेंद्रिय गटांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.