कोल्हापूर (विजय पोवार) : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पर्दाफाश करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडे राज्यातील काही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली. अर्थातच ती प्रकरणे महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांची असल्याने राज्यात चांगलीच खळबळ माजली. पण भ्रष्टाचाराबाबत गेल्या काही दिवसांत जी आव्हाने-प्रतिआव्हाने, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे.

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. त्यामध्ये महाविकास आघाडीतील मातब्बर नेत्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या समर्थकांच्यात आणि पक्षात संताप आणि अस्वस्थतता निर्माण झाली आहे.

नेहमी शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या फार्महाऊसला झटका दिला. तर पारनेर प्रकल्पावरून मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनाही लक्ष्य केले. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खेचले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. यासाठी आवश्यक शेकडो पानाच्या पुराव्यासह, ईडी आणि पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याची तयारी केली.

यामुळे मंत्री मुश्रीफ यांनाही प्रत्युत्तर देणे भाग पडले. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आणि अब्रुनुकसानीच्या दाव्याचा इशारा दिला. दुसऱ्या बाजूला आपल्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त बनले. किरीट सोमय्या यांचा विविध मार्गाने निषेध केला. तर किरीट सोमय्या यांनीही कोल्हापुरात येऊन घोरपडे कारखान्याची पाहणी दौरा जाहीर केला. सोमय्या यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिआव्हान म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोल्हापूरी हिसकादाखवण्याचा इशारा दिला. त्यामुळे किरीट सोमय्या कोल्हापुरात आले तर उद्रेक होऊ शकतो हे जाणून गृहमंत्रालयाने काही निर्णय घेतले.

कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत सोमय्या यांना जिल्हाबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यांना मुंबईत रोखण्याचा प्रयत्न झाला. सोमय्या थांबले नाहीत. ते कोल्हापूरकडे रेल्वेने रवाना झाले. पोलिस खात्याची तारांबळ उडाली. आणि अखेर त्यांना कराड येथे रोखण्यात पोलिसांना यश आले. कराडमध्ये थांबल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन दुसरा अंक सुरू केला.

आपल्यावरील कारवाईबद्दल सोमय्या यांनी मुख्यमंत्री कार्यालय, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जबाबदार धरले. आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे असलेल्या पारनेर, जरंडेश्वर, कागल येथे पुन्हा जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मंत्री मुश्रीफ यांचा दुसरा भ्रष्टाचार म्हणून गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे कारखान्यात शंभर कोटीचा गैरव्यवहार  केल्याचा आरोप करुन या प्रकरणात मंत्री मुश्रीफ यांच्या जावयांनाही गोवले.

किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने हात वर केले. गृहमंत्रालयाने मात्र त्याची जबाबदारी स्वीकारली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्यांवरील कारवाई बाबत शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच सोमय्या यांच्यावर एक दगड जरी पडला तरी परिणाम वाईट होतील असा इशारा दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमय्या यांचे पाठराखण करताना महाविकास आघाडीवर नेम धरला.

मंत्री मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचा दुसरा आरोप झाल्याने त्यांना पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावे लागले. यामध्ये त्यांनी आरोप फेटाळताना सोमय्यांवरील अब्रुनुकसानीच्या दाव्याची रक्कम शंभर कोटी वरून दीडशे कोटी केली. सोमय्या यांच्या सर्व कृतीचे कोल्हापूरला जाताना जागोजागी आणि परत मुंबईत आल्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी सध्या मौन बाळगले आहे. तरी महाविकास आघाडीतील राजकीय अस्वस्थता लपून राहिलेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण मात्र ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे.