हमिदवाडा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षण विभाकाकडील सर्व रिक्त तात्काळ भरावीत. यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय आज (सोमवार) राज्य कार्यकारणीच्या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते.

या सभेत, शासनाकडे संघटनेने अनेकवेळा मागणी करूनही शासनाने पदे भरलेली नाही. सध्या राज्यात विस्तार गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सहाय्यक शिक्षक गेले वर्षभर मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे. बालकाच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार ६ महिन्यापेक्षा जास्त काळ पदे रिक्त ठेवता येत नाहीत.

इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांना इ. पाचवीचे वर्ग तात्काळ जोडून सदर वर्ग सुरू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे व डिसीपीएस चा हिशोब देणे,  सर्व विद्यार्थ्याना गणवेश मिळणे व उपस्थिती भत्ता सर्वच मुलींना दहा रु. देणे, बँक पतसंस्था महिला सभासदांच्या प्रमाणात संचालक प्रतिनिधित्व मिळावे, सर्व शाळांना शिक्षकेत्तर पदे मंजूर करावीत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच या विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. सदर समस्यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

यावेळी विनायकराव घटे यांची राज्यप्रमुख सल्लागारपदी, शारदा वाडकर यांची महिला राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या सभेला संघटनेचे राज्यभरातील सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.