बंदूक घेतलेला स्टेटस लावून दहशत माजविण्याचा प्रयत्न : तिघांना अटक

0
116

इचलकरंजी (प्रतिनिधी) : हातात बंदूक घेत त्याचा व्हिडिओ करून व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत दहशत माजवणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. मोहसीन अमीर फकीर (वय १९, रा. कबनूर), अभिजीत राजाराम तावदारे (वय २९, रा. गोकुळ चौक) व हैदर मन्सूर मुजावर (वय २१, रा. बागडे गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. स्टेटस् व्हिडिओ करताना वापरलेली बंदूक ही लायटर असल्याचे तपासात पुढे आले असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.

कबनूर येथील मोहसीन फकीर याने सोमवारी सकाळी आपल्या दोघा मित्रांबरोबर हातात बंदूक घेत मुळशी पॅटर्न चित्रपटातील संवादाचा चिथावणीखोर व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला लावून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ मोहसीन फकीर, अभिजीत तावरे, हैदर मुजावर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. शहर व परिसरात असे प्रकार घडत असतील तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपाधिक्षक बी. बी. महामुनी यांनी केले आहे.