कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील एका कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला. शिवसेनेसह सर्व पक्षांचे जिल्ह्यातील नेते या कार्यक्रमास उपस्थित होते.  यावेळी मंत्री सुभाष देसाई यांचेसह सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण केली. याबद्दल ना. मुश्रीफ यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

अमरीशसिंह घाटगे म्हणाले, सगळ्यात सक्षम ग्रामविकास मंत्री म्हणून नामदार हसन मुश्रीफ यांचे नाव घ्यावे लागेल. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पंधरवड्यापूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली आहे. मात्र मुश्रीफसाहेब मी तुमच्या विरोधात उभारणार नाही.

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितले की, हसन मुश्रीफ आणि मी महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकाचे मित्र आहोत.  अल्पसंख्यांक समाजात जन्मूनही बहुजनाची सेवा करण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे. आम्ही आत्तापर्यंत सहा वेळा एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलो. पहिल्या निवडणुकीतील विजय वगळता पुढे सलग पाचवेळा माझा पराभव झाला. परंतु पराभव मुश्रीफांसारख्या कर्तबगार विरोधकाकडून झाल्यामुळे आजअखेर मला त्याचे कधीच दुःखही झाले नाही.

मुश्रीफ यांनीही संजयबाबा घाटगे यांच्याशी असलेले वैयक्तिक आणि राजकीय संबंध, कॉलेज जीवनापासून ची दोस्ती आणि त्यानंतर राजकीय जीवनातील दुश्मनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकारणातून संजयबाबा घाटगे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे, मात्र, त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये असा आपुलकीचा सल्लाही दिला.

यावेळी खा. संजय मंडलिक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आ. पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.