अॅडव्हान्सबाबत महापालिका कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य : संदीप देसाई

0
16

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर देण्यात येणाऱ्या तसलमात रक्कमेबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नव्हता. आज (मंगळवार) प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे १२ हजार ५०० इतकी रक्कम तसलमात म्हणून मिळावी अशी मागणी आपने केली होती. याला यश आल्याचे प. म. अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० इतका अॅडव्हान्स देण्याची मागणी केली होती. अन्यथा ‘थाळीनाद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाल्याने वर्ग चार कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० इतकी तसलमात देण्याचे मान्य केले. यासोबतच गेली दोन वर्षे बंद असलेला महागाई भत्ता पुन्हा सुरू करून चालू महिन्याच्या पगारात ११ टक्के इतका भत्ता देण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली.

‘आप’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची तसलमात मिळाल्याने त्यांना न्याय मिळाला आहे. अँडव्हान्स मिळाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.