कोल्हापुरातील सर्व मंदिरे सायंकाळी सहानंतर राहणार बंद…

0
222

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील सर्व मंदिरे शुक्रवार दि. १९ मार्चपासून सायंकाळी ६ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी आज (गुरुवार) पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. बलकवडे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर, ओढ्यावरील गणपती, श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान, बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौकातील पंचमुखी मारुती, त्र्यंबोली मंदिर, टेंबलाईवाडी, बालिंगा येथील कात्यायनी मंदिर ही सर्व मंदिरे भाविकांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत खुली राहतील. सायंकाळी सहानंतर मंदिरे बंद राहतील. असा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची कार्यवाही शुक्रवार दि. १९ पासून करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करुन भाविकांनी या वेळेतच दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.