वाहनचालक, पत्रकारांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्या : सर्वपक्षीय वाहनचालक संघटनेची मागणी

0
67

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे काम वाहन चालकांबरोबरच पत्रकारांनी केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना, पत्रकारांना शासनाने मोफत कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आज (गुरुवार) शिवसेना उप जिल्हाप्रमुख महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय वाहनचालक संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयात शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

गौड यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात आरोग्य यंत्रणेबरोबरच पत्रकार, वाहनचालकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले आहे. वाहनचालकांना प्रवाशांना ने -आण करण्यासाठी विविध ठिकाणी जावे लागते. त्यामुळे विविध लोकांशी संपर्क येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालक आणि पत्रकार या दोन्ही घटकांच्या आरोग्याचा विचार करुन त्यांना मोफत कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी.

या शिष्टमंडळात वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवानंद हिरेमठ, संघर्ष वाहतूक मालक संघटनेचे प्रदेश प्रभारी चंदू पोवार, क्रांतीकारी वाहतूक संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष विश्वास बचुटे, छ. शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शरिफ तांबोळी, छ. शाहू महाराज टेम्पो संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोखंडे, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.