नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महामंडळाने निवदेनाद्वारे आज (रविवारी) दिली आहे. नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. मात्र, कोरोनामुळे संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू होते. साहित्य महामंडळ व नाशिकच्या स्वागत मंडळाचे कोरोना संसर्गावर लक्ष होते. पण संसर्ग कमी न होता  वाढू लागला आहे. हे लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संमेलनाला येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशभरातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना संक्रमण डिसेंबरमध्ये आटोक्यात आले होते. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते. परंतु वाढत्या कोरोनामुळे संमेलन स्थगित करण्यात आले आहे.