ओबीसी समाजाचे यापुढील सर्व मोर्चे रद्द…

माजी खासदार समीर भुजबळ यांची घोषणा

0
86

औरंगाबाद (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचे यापुढचे मोर्चे रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचे आश्वासन मिळाल्याने पुढचे सर्व मोर्चे रद्द केल्याचं समीर भुजबळांनी म्हटलंय. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज (शुक्रवार) औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले होते.

औरंगाबाद शहरातील औरंगपुरा भागामध्ये असलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. समीर भुजबळ म्हणाले की, औरंगाबाद येथील आजचा हा मोर्चा नसून तो आभाराचा मेळावा आहे. यापुढे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार नाही. ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे नियोजित आंदोलन होते त्या ठिकाणी केवळ तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे यापुढील ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे रद्द करत आहे.