जपान : प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन असते आणि त्या त्या देशाची सरकारे चलन छपाई करत असतात; पण जपानने सुद्धा रुपयाच्या नोटा छापल्या होत्या, याची फारशी माहिती कोणाला नाही. ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्ध काळातली. त्यावेळी जपानने तत्कालीन बर्मावर म्हणजे आजच्या म्यानमारवर कब्जा केला होता आणि अंदमान निकोबारवर कब्जा मिळविण्यासाठी कूच केले होते.

इंग्रजानी जपानी नौसेनेला एक प्रकारे या भागात मुक्त प्रवेशच दिला होता. २२ मार्च १९४२ मध्ये जपान्यांनी अंदमान निकोबारचा ताबा घेतला होता. या भागावर आपले प्रभुत्व स्थापन करण्यासाठी जपानने करन्सी लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. या भागात रुपया अगोदरच प्रचलित होता. म्हणून जपानने त्याच नावाने चलन सुरु केले. त्यावेळी जपानच्या केंद्रीय बँकेने १,५,१० आणि १०० रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. त्यावर जपान सरकार असे लिहिले गेले होते. सिंगापूर सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अर्धा रुपया, १,५,१० आणि १०० रुपयाचे बी सिरीज बीए, बीडी असे त्यावर कोड होते.

या नोटांवर बौद्ध धर्माची स्पष्ट झलक होती. सेन्ट्रल बॉटम ला जापनीज गव्हरन्मेंट ऑफ ग्रेट इम्पिरियल जपान असे लिहीले गेले होते. पण दुसऱ्या महायुद्धात जपान कमजोर पडले आणि त्यांना होणारा स्थानिक विरोध वाढला. त्यात १९४५ मध्ये अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्याने त्यांनी शरणागती पत्करली; पण आजही या जपानी रुपया नोटा अस्तित्वात असून, त्या फार मौल्यवान मानल्या जातात.