आजरा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत थुंकीमुक्त करण्याचा संकल्प आजरा महाविद्यालयामध्ये सोडण्यात आला आहे. आजरा महाविद्यालयासह आजरा शहर, इतर गावे आणि परिसरही या दृष्टीने थुंकीमुक्त करण्याचा हा संकल्प चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिक शपथ घेण्यात आली.

आरोग्यास हानिकारक असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, मावा, इत्यादीपासून दूर राहून आरोग्य चांगले राखणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने केवळ महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य किंवा राष्ट्रच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले. त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा अथवा मावा सारख्या पदार्थांचे सेवन टाळण्याची शपथ घेण्यात आली. यासाठी ‘थुंकीमुक्त महाविद्यालय’ असा संकल्प करण्यात आला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. व्ही. डी. हाक्के यांनी थुंकीमुक्त शपथेचे वाचन केले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.