प्रभाग आरक्षण सोडतीवर भाजप घेणार हरकती ! : अजित ठाणेकर (व्हिडिओ)

0
882

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या प्रभाग आरक्षणावर भाजप हरकती घेणार असल्याचा इशारा भाजप गटनेते अजित ठाणेकर यांनी दिला आहे. सोडतीवेळी बहुतांश प्रभाग आरक्षणे ही प्राधान्यक्रमाने ठरविण्यात आली. हा प्राधान्यक्रम कसा ठरविला ? सन २००५ व २०२० च्या निवडणुकीची आरक्षणे कोणत्या पद्धतीने धरली आहेत, याची माहिती मिळावी अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.

 

महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीवरूनच अनेक प्रभागात वारंवार तीच तीच आरक्षणे पडल्याचा समज होत असून आरक्षण सोडतीबाबतच्या शंका अजित ठाणेकर यांनी उपस्थित केल्या. प्रशासक  डॉ. बलकवडे म्हणाल्या की, सदर आरक्षण प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. प्रभाग आरक्षण हे संपूर्ण प्रभाग आरक्षण न पाहता प्रभागातील प्रगणक गटांवर मागील २ निवडणुकीत पडलेल्या आरक्षणानुसार ५०% हून अधिक लोकसंख्या कोणत्या आरक्षणात होती याचा विचार करून करण्यात आल्याचे नमूद केले.

या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, मंडल अध्यक्ष प्रग्नेश हमलाई आदी उपस्थित होते.