नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियासमोर बोलताना थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे असे राऊत म्हणाले, तर राऊत काहीही बोलल्याने आमच्या अंगाला भोके पडत नाहीत, असे अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार हे मीडियाशी बोलत होते.
नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचे पालन करायला पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो. ते उभ्या देशाला दाखवून दिले आहे. प्रत्येकांनी तारतम्य ठेवून वागावे, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांच्या विधानाबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावर आधी त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत बोलण्यास नकार दिला. मात्र, नंतर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, त्यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला काही भोके पडत नाहीत. ती मोठी माणसे आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाही आहे. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.