नागपूर (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अजितदादांनी प्रशिक्षण कधी मिळेल, अशी विचारणा फडणवीसांना केली, तर फडणवीस यांनीही ऑनलाईन प्रशिक्षण करू, अशी कोपरखळी लगावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आल्यामुळे अजितदादांनी आपल्या शैलीत टीका करत फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेणार, असा टोला लगावला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले होते, यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘त्यांना एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाईन प्रशिक्षण करू, गुरुकिल्ली एवढीच सांगतो, की ज्या पद्धतीने ते पाच सहा कारखान्याचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो’ असा टोलाही फडणवीस यांनी अजितदादांना लगावला.

गडचिरोली आणि वर्ध्याला डीपीडीसीची बैठक घेणार आहे. त्यानंतर भंडारा आणि नागपूरची बैठक घेणार आहे. येत्या आठवड्याभरात सहा जिल्ह्याच्या बैठका पूर्ण करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ते नागपूर विमानतळावर बोलत होते. अजित पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असे त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा मिश्किल टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला.