वाढीव वीज बिलाबाबत अजित पवारांची विधानसभेत ‘मोठी’ घोषणा

0
512

मुंबई (प्रतिनिधी) : जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) विधानसभेत केली.

वाढीव वीज बिल मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात आहे,  असे म्हणत  फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. तर या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,  आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचे समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील.