मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईवर कर्नाटकचा हक्क असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याला कोणताही आधार नाही. सीमावाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली.